MR/Prabhupada 0302 - लोक शरण जायला तयार नाहीत: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0302 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...") |
(No difference)
|
Revision as of 02:18, 8 June 2018
Lecture -- Seattle, October 2, 1968
प्रभुपाद : तर आपण या चैतन्य शिक्षामृताचे पठण करीत आहोत. आपण आपल्या मागील बैठकीपासून सुरु केले आहे, आणि आता आपण पुन्हा वाचण्यास सुरुवात करू. तु वाचशील हे? ठीक आहे.
तमाल कृष्ण: पृष्ठ एकोणतीस, पण तुम्ही शेवटी कोणता भाग वाचला होता?
प्रभुपाद : कोठूनही वाच, तेवढेच. होय.
तमाल कृष्ण : ठीक आहे. "भगवद्गीतेत आपल्याला हे सांगण्यात आले आहे की प्रत्येकाचे प्राकृतिक स्वरूप हे चेतन जीवात्मा आहे. तो अचेतन पदार्थ नाही. त्यामुळे जीवात्मा असल्याने प्रत्येकजण त्या परमात्मा, परब्रह्म, भगवंतांचा त्यांच्याहून भिन्न असा सूक्ष्म अंश आहे. आपण असेही शिकतो की या जीवात्म्याने भगवंतांना शरण जाणे, हे त्याचे कर्तव्य आहे. भगवद्गीतेची सर्वात अंतिम व सर्वोच्च शिकवण ही की या जीवात्म्याने पूर्णपणे, त्या सर्वोच्च परमात्मा, भगवान कृष्णांना शरण जाऊन परिपूर्ण आनंदाचा अनुभव घ्यावा. येथे भगवान चैतन्य सनातन गोस्वामींच्या प्रश्नांना उत्तर देताना तेच सत्य पुन्हा प्रकट करीत आहेत, परंतु जीवात्म्याबद्दल माहिती न देता, जी आधीच भगवद्गीतेत देण्यात आली आहे."
प्रभुपाद : होय. मुद्दा हा, की या जीवात्म्याची प्राकृतिक स्थिती, भगवद्गीतेत अतिशय विस्तृतपणे वर्णित करण्यात आली आहे. आता भगवद्गीतेची सर्वात अंतिम शिकवण, जसे कृष्ण सांगतात, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ. गी. १८।६६). त्यांनी अर्जुनाला सर्व प्रकारच्या योग पद्धती, सर्व प्रकारचे कर्मकांड, यज्ञ, आणि तार्किक तत्त्वज्ञान, या शरीराची व जीवात्म्याची मूळ प्राकृतिक स्थिती हे सर्व सांगितले आहे. त्यांनी भगवद्गीतेत प्रत्येक गोष्टीचे विवेचन केले आहे. आणि अगदी शेवटी ते अर्जुनाला म्हणतात, "प्रिय अर्जुना, तु माझा अगदी जिवलग मित्र आहेस, म्हणून मी तुला या वैदिक ज्ञानातील सर्वात रहस्यमय गोष्ट सांगत आहे." आणि काय आहे ती? "तू केवळ मला शरण ये." बस, एवढेच. लोक शरणागत व्हायला तयार नाहीत, त्यामुळे त्यांना या सर्व वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. अगदी एका लहान मुलाप्रमाणे, त्याच्या मनात पालकांविषयी शरण जाण्याची भावना असते, त्यामुळे ते आनंदी असते. तेथे तत्त्वज्ञान शिकण्याची काही आवश्यकता नसते, कसे आनंदी राहावे, वगैरे. मूल त्याच्या पालकांच्या काळजीवर पूर्णपणे अवलंबून असते आणि ते आनंदी असते . अगदी साधेसोपे तत्त्वज्ञान. पण आपण या तथाकथित संस्कृती आणि ज्ञानात पुढारलो आहोत, आणि म्हणूनच आपल्याला हे साधेसोपे तत्त्व अनेक कठीण शब्दांत ऐकावेसे वाटते, एवढेच. आणि जर तुम्हाला हेच तत्त्व अनेक क्लिष्ट शब्दांत समजून घ्यायचे असेल, तरी या कृष्णभावनामृत आंदोलनात काही उणीव नाहीये. आपल्याकडे तत्त्वज्ञानावरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही ही सरळ पद्धत स्वीकारणार, की आपल्याला... भगवंत आपल्याहून फार महान आहेत व आपण त्यांचे सूक्ष्म अंश आहोत, त्यामुळे त्यांची सेवा करणे व त्यांना शरण जाणे हे आपले कर्तव्य आहे. बस, एवढेच. आणि म्हणूनच चैतन्य महाप्रभु, या सर्व गोष्टी, जीवाचे स्वरूप, तत्त्वज्ञान, ज्ञान, आणि इतर अनेक गोष्टी, योग पद्धती, या सर्वांचे विवेचन करण्याऐवजी त्वरित सांगतात की अंशात्मक जीवात्म्याचे स्वाभाविक कृत्य आहे त्या पूर्ण परमेश्वराची सेवा करणे. ही... ही चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीची सुरुवात आहे. म्हणजे जेथे भगवद्गीतेची शिकवण संपली, चैतन्य महाप्रभूंनी तेथून आपली शिकवण सुरु केली.
प्रभुपाद : होय, पुढे...
तमाल कृष्ण : "जेथून कृष्णांनी आपली शिकवण संपवली त्या मुद्द्यापासून पुढे ते आपली शिकवण सुरु करतात. श्रेष्ठ भक्तांद्वारे हे स्वीकारण्यात आले आहे की भगवान चैतन्य हे स्वतः कृष्णच आहेत, आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी गीतेत आपली शिकवण संपवली, तेथूनच ते सनातन गोस्वामींना आपली शिकवण देण्यास सुरुवात करतात. भगवान सनातन गोस्वामींना सांगतात, "तुझे स्वाभाविक स्वरूप हे की तू एक शुद्ध जीवात्मा आहेस. हे भौतिक शरीर किंवा तुझे मन म्हणजे तुझी खरी ओळख नव्हे. तुझी बुद्धी किंवा 'मी काहीतरी आहे' असा अहंकारही तुझी खरी ओळख नाही. तुझी ओळख ही की तू त्या सर्वेश्वर भगवान कृष्णांचा नित्य दास आहेस."
प्रभुपाद : आता येथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या आत्म-साक्षात्कारात, ते जे केवळ निव्वळ भौतिक पातळीवर विचार करतात, त्यांना वाटते की, "मी हे शरीर आहे." मी हे शरीर आहे, शरीर म्हणजे इंद्रिये. म्हणून माझी तृप्ती म्हणजे या इंद्रियांची तृप्ती - इंद्रिय-तृप्ती. ही सर्वात हलक्या प्रतीची स्वजाणिव आहे. हे शरीर म्हणजे स्वतः. शरीर म्हणजे स्वतः, मन म्हणजे स्वतः, आणि आत्मा म्हणजेही स्वतःच. स्वतः, एक समानार्थी शब्द. शरीर, मन व आत्मा, सर्वच... तिघे स्वतः म्हणून ओळखले जातात. जीवनाच्या सर्वात स्थूल, बाह्य स्वरूपात, आपल्याला वाटते की शरीर म्हणजे स्वतः. आणखी खोल पातळीवर विचार केला तर मन व बुद्धी हे म्हणजेच स्वतः आहे असे वाटते. परंतु वस्तुतः, आपण स्वतः या शरीर, मन व बुद्धी अशा तिघांच्या पलीकडे आहोत. ही खरी वस्तुस्थिती आहे. ते ज्यांची स्वजाणिव अतिशय बाह्य व हलक्या स्वरूपाची आहे, ते लोक भौतिकवादी आहेत. आणि ते जे मन व बुद्धीच्या पातळीवर आहेत, ते म्हणजे तत्त्वज्ञ व कवि. ते काहीतरी तत्त्वज्ञान मांडतात, किंवा काही काव्य रचतात. परंतु तरीही त्यांची संकल्पना चुकीची आहे. जेव्हा तुम्ही स्वजाणिवेच्या अध्यात्मिक पातळीवर येतात, तेव्हा त्यास म्हणतात 'भक्ती'. हे चैतन्य महाप्रभूंद्वारे स्पष्ट केले जात आहे.