MR/Prabhupada 0316 - अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका, ते फारच घातक आहे

Revision as of 00:18, 29 June 2018 by Parth (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0316 - in all Languages Category:MR-Quotes - 1977 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 7.9.5 -- Mayapur, February 25, 1977

प्रभुपाद : आपण लगेचच उच्च श्रेणीचे भक्त होऊ शकत नाही. आपण हरिदास ठाकुरांचे अनुकरण करू शकत नाही. ते शक्य नाही. परंतु किमान... सङ्ख्यापूर्वकनामगाननतिभिः (षड्गोस्वाम्यष्टक). काहीतरी संख्याबळ मात्र आपण नक्कीच मिळवायला हवे. आणि आपण ते करून दाखवले आहे, त्यामुळे... आपले काही तथाकथित भक्त माझ्यावर टीका करतात की मी केवळ सोळा माळांपर्यंतच मर्यादित ठेवले आहे. नाही, सोळा माळा कशाला? तुम्ही तीनशे माळा करू शकता, पण किमान, किमान सोळा माळा, कारण आपला खूप वेळ देण्यासाठी सराव झालेला नाही. आपण नेहमीच कार्यरत असायला हवे. परंतु केवळ एकाच जागी बसून राहून निरंतर हरेकृष्ण महामंत्राचा जप करणे, ते कोणत्याही बद्ध जीवासाठी शक्य नाही - जोपर्यंत तो मुक्त होत नाही. त्यामुळे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या गुरू महाराजांनी काटेकोरपणे ताकीद दिली आहे, "हरिदास ठाकूर, रूप गोस्वामी, यांसारख्या महान व्यक्तींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका." ते म्हणत असत, रूप गोस्वामी के मोघ वाञ्छा । रूप गोस्वामी, कारण ते केवळ एक लंगोट वापरत असत... त्यक्त्वा तूर्णमशेषमण्डलपतिश्रेणीं सदा तुच्छवत् भूत्वा दीनगणेशकौ करुणया कौपीनकन्था... त्यामुळे रूप गोस्वामींचे अनुकरण करण्यात काही अर्थ नाही, त्यांच्या वेशभूषेचे अनुकरण करावे, आणि त्यानंतर, संधी मिळताच, बिडी प्यावी. (हास्य) अशा प्रकारचा मूर्खपणा करू नका. असे अनुकरण काही कामाचे नाही. अनुसरण करा, अनुकरण नाही. अनुकरण घातक असते. अनुसरण. साधुमार्गानुगमनम्. याला म्हणतात भक्ती. आपण मोठ्या मोठ्या भक्तांचे, साधूंचे अनुसरण करू शकतो, पण आपण... आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. ते फार घातक आहे. आपल्यातील काही भक्त सोडून गेले, ते म्हणतात, "येथे काहीच भजन होत नाही," (हास्य) आणि माझे आशीर्वाद घेतात नवीन गुरू शोधण्यासाठी. तर त्याला माझा आशीर्वाद नवीन गुरू मिळवण्यासाठी हवा आहे. हा मूर्खपणा चांगला नाही. त्यामुळे सर्वात चांगली गोष्ट आहे, महाजनो येन गतः स पन्थाः । (चै. च. मध्य १७.१८६). आता हे महाजन आहेत. प्रह्लाद महाराजही महाजनांपैकीच एक आहेत. बारा महाजनांपैकी प्रह्लाद महाराज एक महाजन आहेत. स्वयम्भूर्नारदः शम्भुः कपिलो मनुः प्रह्लादः । (श्री. भा. ६.३.२०). येथे प्रह्लाद महाराजांचे नाव आहे. जनको भीष्मो बलिर्वैयासकिर्वयम् । (श्री. भा. ६.३.२०). त्यामुळे प्रह्लाद महाराज महाजन आहेत. तर मग त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. अनुसरण. साधुमार्गानुगमनम्. तर मग प्रह्लाद महाराजांनी काय केले? त्यांच्या वडलांनी त्यांना फार कष्ट दिले, मग त्यांनी काय केले? ते केवळ कृष्णांचा विचार करत असत, "मी काय करू शकतो? माझे वडील माझ्या विरुद्ध आहेत." हे आहे मन्मना भव मद्भक्तः । आणि शेवटी, जेव्हा त्यांचे वडील मारले गेले, तेव्हा ते प्रणाम समर्पित करत होते. तर या चार गोष्टींचे एका शुद्ध भक्ताप्रमाणे मनःपूर्वक अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. सर्वोपाधिविनिर्मुक्तम् । (चै. च. मध्य १९.१७०). प्रह्लाद महाराजांनी कधीच विचार केला नाही की "मी हिरण्यकशिपूचा मुलगा आहे." कधीच नाही. ते नेहमी हाच विचार करत की "मी नारदांचा दास आहे." ते असेच म्हणत. जेव्हा नृसिंहदेवांना त्यांना वरदान द्यायचे होते, तेव्हा त्यांनी नृसिंहदेवांकडे मागितले की, "कृपया मला तुमचे सेवक नारद ह्यांच्या सेवेत मग्न ठेवा, ज्यांच्यामुळे मला ही शिकवण मिळाली." ते कधीच म्हणाले नाहीत, "मला माझ्या वडिलांची सेवा करू द्या." नाही. कारण त्यांना शिकवण मिळाली होती, ते नेहमीच... चक्षुदान दिलो जन्मे जन्मे पिता सेइ । तेच वडील आहेत. अन्य कोणीही वडील नाही. चक्षुदान दिलो जेइ, जन्मे जन्मे पिता सेइ । पुढची ओळ काय आहे? भक्त : दिव्य ज्ञान हृदे प्रकाशितो । प्रभुपाद : होय, दिव्य ज्ञान हृदे प्रकाशितो । त्यामुळे तेच वडील आहेत. त्यामुळे आपण ही गोष्ट मनात पक्की करून घ्यायला हवी. उपटसुंभाप्रमाणे उद्धटपणे हे कृष्णभावनामृत आंदोलन सोडून देऊ नका. खूप खूप धन्यवाद.