MR/Prabhupada 0301 - सर्वात बुद्धिमान लोक, ते नृत्य करीत आहेत



Lecture -- Seattle, October 2, 1968

आता हे कृष्णभावनामृत आंदोलन आपण भगवान चैतन्यांच्या शिकवणीतून समजून घ्यायला हवे. ते... पाचशे वर्षांपूर्वी, ते बंगालमध्ये अवतीर्ण झाले. भारतातील एका प्रांतात, आणि त्यांनी विशेषत्वे कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार केला. त्यांचे ध्येय होते की जो कोणी या भारतभूमीत जन्माला आला आहे त्याने या कृष्णभावनामृत आंदोलनात सहभागी व्हावे आणि त्याचा प्रचार सर्व विश्वभर करावा. त्या आज्ञेचे पालन करत आम्ही तुमच्या देशात आलो आहोत. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही या कृष्णभावनामृत आंदोलनाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या पूर्ण ज्ञानानिशी, काटेकोरपणे. त्याला आंधळेपणाने स्वीकारू नका. तुमच्या युक्तिवाद, ज्ञान, तर्क, अनुभव या सर्वांच्या साहाय्याने समजण्याचा प्रयत्न करा - तुम्ही मनुष्य आहात - आणि तुम्हाला हे आंदोलन निःसंशयपणे सर्वोत्कृष्ट वाटेल. आम्ही हे चैतन्य शिक्षामृत नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे, आणि इतरही खूप पुस्तके प्रकाशित केली आहेत. तुम्ही ती वाचायचा प्रयत्न करा. आणि आमचे एक मासिकही आहे, जाऊ देवाचिया गावा (Back to Godhead). आम्ही नृत्य करीत आहोत, पण आम्ही निव्वळ भावनात्मक लोक नाहीत. या नृत्याचे फार मोठे मूल्य आहे ; जे तुम्हाला हे नृत्य केल्यावरच अनुभवास येईल. हे काही मूर्ख लोक नृत्य करत नाहीयेत. नाही. सर्वात बुद्धिमान लोक, ते नृत्य करीत आहेत. परंतु ते इतक्या चांगल्या प्रकारे रचण्यात आले आहे की एक मुलगा सुद्धा - जसे की हा मुलगा - सुद्धा यात भाग घेऊ शकतो. सामील व्हा, हरेकृष्ण या नावांचे कीर्तन करा, आणि तुम्हाला जाणवेल. अगदी सोपी पद्धत. तुम्हाला अगदी उच्च प्रतीचे तत्त्वज्ञान किंवा कठीण शब्द जाणून घेण्याची आवश्यकता नाही. अगदी साधीसरळ गोष्ट. काय आहे ती? भगवंत महान आहेत, आणि आपण सर्वजण त्या महान भगवंतांचे अंश आहोत. आणि जेव्हा आपण त्या महान भगवंतांच्या संपर्कात येऊ, आपणही महान होऊ. जसे की तुमचे शरीर, तुमच्या शरीराचा एक लहानसा भाग, एक लहानसे बोट, त्याचेही मूल्य शरीराइतकेच आहे. परंतु जेव्हा तो लहान किंवा मोठा भाग या शरीरापासून वेगळा होतो, त्याला कोणतेही मूल्य राहत नाही. त्याला काहीही मूल्य राहत नाही. हे बोट, तुमच्या शरीराचा अगदी लहानसा भाग. जर तेथे काही त्रास असेल, तर तुम्ही हजारो रुपये खर्च करता. त्या त्रासाला दूर करण्यासाठी तुम्ही चिकित्सकाला हजारो रुपये देता, आणि जेव्हा तो चिकित्सक म्हणतो, "या बोटाला," "निखळवावे किंवा कापावे लागेल, वेगळे करावे लागेल, अन्यथा संपूर्ण शरीर खराब होईल," मग जेव्हा ते बोट तुमच्या शरीरापासून वेगळे केले जाते, तेव्हा तुम्ही त्या बोटाबद्दल काहीही काळजी करीत नाही. काहीही मूल्य नाही. फक्त समजण्याचा प्रयत्न करा. एक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर), जेव्हा त्यातील एक लहानसा स्क्र्यू गायब असतो, ते यंत्र योग्य काम करत नाही. तुम्ही दुरुस्तीसाठी दुकानावर जातात. तो तुम्हाला दहा डॉलर आकारतो, तुम्ही तात्काळ खर्च करतात. तो लहानसा स्क्र्यू, जेव्हा तो त्या मशीनपासून वेगळा असतो, त्याला एका कवडीचीही किंमत नसते. अगदी त्याचप्रमाणे, आपण सर्वजण त्या सर्वोच्च ईश्वराचे अंश आहोत. जर आपण त्या ईश्वरासह कार्ये करू, अर्थात, कृष्णभावनेत अथवा भगवद्भावनेत कर्मे करू, जसे की "मी भगवंताचा अंश आहे... " ज्याप्रमाणे हे एक लहानसे बोट माझ्या पूर्ण शरीराच्या जाणिवेने कार्य करते. जेव्हा जेव्हा तेथे काही वेदना असेल तर मी ती जाणू शकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही कृष्णभावनेत स्थित असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वाभाविक स्थितीत जगत असाल, तुमचे जीवन सफल होईल. आणि ज्या क्षणी तुम्ही कृष्णभावनेहून भिन्न असाल, तर तेथेच सर्व समस्या आहेत. तेच सर्व समस्यांचे मूळ आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. ती आपण या वर्गांत उद्धृतही करतो. त्यामुळे जर आपल्याला खरोखर आनंदी व्हायचे असेल तर आपण या कृष्णभावनेचा स्वीकार करायला हवा, आणि आपल्या मूळ आनंदमय स्थितीत स्थिर असायला हवे. हेच कृष्णभावनामृत आंदोलन आहे.