MR/Prabhupada 0304 - माया पूर्णब्रह्माला आच्छादित करू शकत नाही



Lecture -- Seattle, October 2, 1968

प्रभुपाद : पुढे...

तमाल कृष्ण : " जीवात्मा व परमात्मा या दोघांतील संबंधात हे अचिंत्य भेदाभेदाचे तत्त्व सदैव अस्तित्वात असते."

प्रभुपाद : आता हे अचिंत्य भेदाभेदाचे तत्त्व, येथेही जमिनीचेच उदाहरण घ्या. काहीजण म्हणतात, "अरे, तो भाग आम्ही पाण्यात पाहिला." आणि काहीजण म्हणतात, "नाही, तोच भाग आम्हाला जमिनीवर दिसला." म्हणूनच अचिंत्य भेदाभेद. एकच वेळी भेदही व अभेदही. आपली स्थिती... कारण आपण आत्मा आहोत आणि कृष्ण, भगवंत, तेदेखील आत्मा आहेत... परंतु ते परमात्मा आहेत आणि मी त्या परमात्म्याचा एक अंश असा जीवात्मा आहे. जसे की स्वतः सूर्यदेवता, सूर्यगोल, आणि सूर्यप्रकाश, या प्रकाशकिरणांचे लहान रेणू, तेसुद्धा सूर्यप्रकाशच आहेत. या प्रकाशाच्या अणूंच्या संयोजनातून प्रकाशकिरण प्राप्त होतात. त्याचप्रमाणे आपणही त्या सूर्यगोलाच्या तेजस्वी कणांप्रमाणे आहोत, परंतु आपण संपूर्ण सूर्याशी समतुल्य नाहीत. सूर्यप्रकाशातील तेजस्वी कण परिमाणात संपूर्ण सूर्यासारखे नसतात, परंतु गुणांच्या दृष्टीने त्यांच्यातही प्रकाश असतोच. त्याचप्रमाणे, आपण जीवात्मा, त्या सर्वश्रेष्ठ परमात्मा श्रीकृष्णांचे किंवा भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म अंशकण आहोत. त्यामुळे आपणही प्रकाशित आहोत. आपल्यातही तेच गुण आहेत. ज्याप्रमाणे सोन्याचा अगदी लहानसा कण हाही सोनेच असतो, लोखंड असत नाही. त्याचप्रमाणे आपण जीवात्मा आहोत व गुणात्मकदृष्ट्या परमात्म्याशी एक आहोत. परंतु आपण सूक्ष्म आहोत... सारख्याच उदाहरणानुसार. सीमांत प्रदेश अत्यंत लहान असतो, आणि त्यामुळेच तो काहीवेळ पाण्याने व्यापलेला असतो. परंतु जमिनीच्या विशाल भूभागात कोठेही पाणी असत नाही. त्याप्रमाणे, मायाही आत्म्याच्या सूक्ष्म कणांना आच्छादित करू शकते, परंतु माया सर्वोच्च पूर्णब्रह्माला आबद्ध करू शकत नाही. तेच उदाहरण, आकाश व सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाचा काही भाग ढगाने आच्छादला जातो. परंतु जर तुम्ही विमानाने किंवा जेट विमानाने ढगांच्या वर जाल, तुम्ही पाहाल की सूर्यप्रकाश कोणत्याही ढगाने आच्छादित होत नाही. एक ढग संपूर्ण सूर्याला आच्छादित करू शकत नाही. त्याचप्रमाणे, मायासुद्धा सर्वोच्च पूर्णतत्त्वाला आच्छादित करू शकत नाही. माया पूर्णब्रह्माच्या सूक्ष्म अंशकणांना बद्ध करू शकते. मायावादाचा सिद्धांत सांगतो: "मी आता मायेने बद्ध नाही. मी मुक्त झालो आहे, आणि म्हणूनच मी पूर्णब्रह्म झालो आहे... " परंतु त्याप्रकारे आपण पूर्णब्रह्माशी एक नाहीत. सूर्यप्रकाश व सूर्यगोल, दोघांच्या गुणांत काही अंतर नाही. जेथे सूर्य आहे तेथे सूर्यप्रकाश आहे, परंतु सूर्यप्रकाशातील सूक्ष्म कण, सूर्यप्रकाशातील रेणू, संपूर्ण सूर्यगोलाशी एकसारखे नाहीत. हे चैतन्य महाप्रभूंद्वारे या अध्यायात स्पष्ट केले जात आहे.