MR/Prabhupada 0313 - सर्व श्रेय श्रीकृष्णांचे आहे
Lecture on SB 3.26.42 -- Bombay, January 17, 1975
भक्ताचे कार्य आहे स्तुती करणे. तो कोणतेही श्रेय घेत नाही. खरेतर, श्रेय घेण्यासारखे काहीच नाही. सर्व श्रेय श्रीकृष्णांचे आहे. एक भक्त कधीही तसा दावा करत नाही; तसे शक्यही नाही. जरी तो एक फार महान भक्त असला, तरी तो त्याच्या श्रेष्ठ कृत्यांसाठी काहीच श्रेय घेत नाही. त्याची गौरवशाली कृत्ये म्हणजे श्रीकृष्णांना गौरवशाली बनविणे. ही त्याची गौरवशाली कृत्ये आहेत, त्या तथाकथित भौतिकवाद्यांप्रमाणे नाही, ज्यांना श्रेय हवे असते. नाही. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः (भ. गी. १८.४६). स्वकर्मणा. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कृत्यांमध्ये कार्यरत असू शकता. परंतु आपल्या कृत्यांच्या माध्यमातून तुम्ही श्रीकृष्णांचे अस्तित्व प्रकट करा, आणि मग जे काही होईल, ते सर्व श्रीकृष्णांच्या निपुण अध्यक्षतेखाली होईल. सूर्य एका विशिष्ट वेळेलाच उगवतो, आणि विशिष्ट वेळेलाच मावळतो. आणि विविध ऋतूंप्रमाणे तापमान, त्याची स्थिती, उत्तरायण, दक्षिणायन - सर्वकाही अतिशय नैपुण्याने श्रीकृष्णांच्या अध्यक्षतेखाली नियोजित असते. मयाध्यक्षेण प्रकृतिः (भ. गी. ९.१०). असा विचार करू नका की सूर्य आपोआप अशा सुयोग्य पद्धतीने कार्य करीत आहे. आपोआप नाही. स्वामी, कृष्ण, अस्तित्वात आहेत. यस्याज्ञया भ्रमति सम्भृतकालचक्रः. या जगात सूर्य ही एक अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे. असे लाखो सूर्य अस्तित्वात आहेत. हा केवळ एक सूर्य आहे - पण तो श्रीकृष्णांच्या आदेशाचे पालन करीत आहे. यच्चक्षुरेष सविता सकलग्रहाणां राजा समस्तसुरमूर्तिरशेषतेजाः. अशेषतेजाः, अमर्याद प्रकाश, अमर्याद आग, अमर्याद उष्णता. अशेष. अशेषतेजाः. सूर्याच्या प्रकाश व उष्णतेशी कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. या संपूर्ण जगात कशाशीही तुलना केली जाऊ शकत नाही. अमर्याद. लाखो वर्षांपासून सूर्यातून प्रकाश व उष्णता बाहेर पडत आहे, पण त्यात काही घट झाली नाही. तो आजही तसाच आहे जसा तो लाखो वर्षांपूर्वी होता. आणि तुम्हाला लाखो वर्षांपासून प्रकाश व उष्णता देऊन, आजही त्याच्यात तितक्याच प्रमाणात प्रकाश व उष्णता आहे.
ज्याप्रमाणे अमर्याद उष्णता व प्रकाश देऊनही यथावतच राहणे हे सूर्यासारख्या एका भौतिक वस्तूसाठी शक्य असेल, तर त्याचप्रमाणे, त्यांच्या शक्तींचा विस्तार करूनही परमेश्वर यथारूपच राहतात. त्यांच्यात काहीही घट होत नाही. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते (ईशोपनिषद मंगलाचरण). त्यामुळे जर आपण एका सामान्य भौतिक वस्तूतही हे पाहू शकतो की लाखो वर्षांसाठी उष्णता बाहेर पडल्यावरही त्यात तेवढीच उष्णता असते, तेवढीच उष्णता, तेवढाच प्रकाश असतो, तर मग ते परमेश्वरांसाठी संभव का नसेल? त्यामुळे ईशोपनिषद आपल्याला सांगते की पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जर तुम्ही कृष्णांकडून त्यांची सर्व शक्ती घेऊन टाकणार, तरीही, ती संपूर्ण शक्ती कृष्णांतच असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. आजकाल, आधुनिक देव - असे अनेक "आधुनिक देव" आहेत; मला त्यांचे नाव घ्यायचे नाही; पण एक आधुनिक देव, त्याने त्याची शक्ती एका शिष्याला दिली, आणि जेव्हा तो सचेत झाला, तेव्हा तो रडत होता. त्या शिष्याने आपल्या गुरूला विचारले, "तुम्ही रडत का आहात, महाराज?" "आता मी सर्वकाही संपवून टाकले. मी तुला सर्वकाही देऊन टाकले. मी तुला सर्वकाही देऊन टाकले; त्याच्यामुळे आता मी संपलो आहे." हे आध्यात्मिक नाही. हे तर भौतिक आहे. माझ्याकडे शंभर रुपये आहेत. जर मी तुला शंभर रुपये दिले, तर माझा खिसा रिकामा होईल. परंतु कृष्ण तसे नाहीत. कृष्ण हजारो, लाखो कृष्ण तयार करू शकतात; तरीही, ते कृष्णच राहतील. असे आहेत कृष्ण. त्यांची शक्ती कधीही घटत नाही. याला म्हणतात पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते (ईशोपनिषद मंगलाचरण). असे खोटे भगवंत काही कामाचे नाहीत. खरे भगवंत. खरे भगवंत,
- ईश्वरः परमः कृष्णः
- सच्चिदानन्दविग्रहः ।
- अनादिरादिर्गोविन्दः
- सर्वकारणकारणम् ।।
- (ब्र. सं. ५.१)
सर्वकारणकारणम्, त्यांच्यात कधीही घट होत नाही, त्यांच्यात कधीही घट होत नाही. असे म्हटले आहे,
- यस्यैकनिश्वसितकालमथावलम्ब्य
- जीवन्ति लोमविलजा जगदण्डनाथाः ।
- विष्णुर्महान्स इह यस्य कलाविशेषो
- गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ।।
- (ब्र. सं. ५.४८).
त्यांच्या श्वसनाच्या काळात लाखो ब्रह्माण्डे उद्भवतात, आणि पुन्हा ती नष्ट होतात जेव्हा ते श्वास आत घेतात. या पद्धतीने ही ब्रह्माण्डे उद्भवत आहेत. जगदण्डनाथाः. जगदण्डनाथाः. जगदण्ड म्हणजे हे ब्रह्माण्ड. आणि नाथ, ब्रह्माण्डाचे स्वामी, म्हणजे ब्रह्मदेव. त्यांच्या जीवनाचा एक कालावधी आहे. आणि तो कालावधी किती आहे? महाविष्णूंच्या श्वसनाचा कालावधीइतका.