MR/Prabhupada 0309 - गुरू सनातन असतात



Lecture -- Seattle, October 2, 1968

मधुद्विष : कोणत्याही गुरूच्या सहायतेविना, केवळ येशू ख्रिस्तांच्या वचनांवर विश्वास ठेवून व त्यांच्या आज्ञांचे पालन करून, एखादा ख्रिस्ती मनुष्य ईश्वरीय दिव्य धामात प्रवेश करू शकतो का?

प्रभुपाद : मला समजले नाही...

तमाल कृष्ण : आजच्या युगात, एखादा ख्रिस्ती मनुष्य गुरूच्या सहायतेविना, केवळ बायबलचे पठण करून व येशू ख्रिस्तांच्या आदेशाचे पालन करून, ईश्वराच्या धामात...

प्रभुपाद : बायबलचे पठण करतानाही तुम्ही गुरूच्याच आदेशाचे पालन करत असता. अन्यथा ते कसे होणार? बायबलचे पठण करताना तुम्ही येशू ख्रिस्तांच्या आदेशाचे पालन करता, म्हणजेच तुम्ही गुरूंचे अनुसरण करत असता. गुरूंशिवाय असण्याची शक्यताच कोठे उद्भवते?


मधुद्विष : मी जिवंत गुरूंबद्दल बोलत होतो.

प्रभुपाद : गुरू हे... गुरू हे सनातन असतात. ते शाश्वत असतात. तुझा प्रश्न गुरूंशिवाय असण्याबद्दल आहे. जीवनाच्या कोणत्याही स्तरावर तुम्ही गुरूंशिवाय असू शकत नाहीत. तुम्ही या गुरूंना स्वीकारा किंवा त्या गुरूंना. ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला स्वीकारावे लागेल. तू म्हणतोस, "बायबलचे पठण करून," बायबलचे पठण करताना आपण येशू ख्रिस्तांच्या परंपरेतील एखाद्या पुजारी किंवा चर्चमधील अधिकाऱ्याच्या स्वरूपातील गुरुंचेच अनुपालन करत असतो. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला गुरूंच्या आज्ञांचे पालन करावेच लागेल. गुरूंशिवाय असण्याचा प्रश्नाचे उद्भवत नाही. स्पष्ट आहे ना हे?

मधुद्विष : मला म्हणायचे आहे की जसे तुमच्या मदतीशिवाय व सादरीकरणाशिवाय आम्ही भगवद्गीता समजून घेऊ शकत नाही,

प्रभुपाद : त्याच पद्धतीने तुम्हाला चर्चमधील पुजाऱ्याच्या साहाय्याने बायबल समजून घ्यावे लागेल.

मधुद्विष : होय. पण तो पुजारी त्याच्या गुरू-शिष्य परंपरेतून किंवा त्याच्या बिशपकडून बायबलचा योग्य अर्थ घेतो का? कारण बायबलच्या विविध अर्थांमध्ये काहीशी विसंगती दिसून येते. ख्रिस्ती धर्मात अनेक पंथ आहेत जे बायबलचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावतात.

प्रभुपाद : नक्कीच, बायबलमध्ये कोणताही गैरअर्थ करता येऊ शकत नाही. जर तसे केले गेले, तर बायबल विश्वासार्ह राहणार नाही. जर तुम्ही काही वेगळा अर्थ लावणार... जसे, "फावड्याला फावडाच म्हणा." जर तुम्ही दुसरे काहीतरी म्हणणार, तर ती वेगळी गोष्ट आहे. तर तो गुरू असणार नाही. जसे की हे घड्याळ आहे. सर्वजण त्याला घड्याळच म्हणतात, आणि जर मी त्याला चष्मा म्हणालो, तर माझ्या गुरू असण्याचे काय मूल्य राहील? मी चुकीचा मार्ग दाखवत असेल. हे घड्याळ आहे, असे मला म्हणावेच लागेल. (हास्य) त्यामुळे... जो गैरअर्थ लावत असेल, तो खरा गुरू नव्हे. तो गुरूच नाही, खरा असणे तर दूरची गोष्ट. जर मला तुम्हाला घड्याळ कसे पाहायचे हे शिकवायचे असेल, तर मी म्हणून शकतो की "हे घड्याळ आहे, हा हात आहे, आणि वेळ अशा प्रकारे दर्शविली जाते; हे, याला म्हणतात... " मग ते योग्य आहे. आणि जर तुम्ही म्हणणार, "सर्वजण याला घड्याळ म्हणतात, मी याला चष्मा म्हणेल," तर मग तुम्ही कोणते गुरू आहात? तशा गुरूचा त्वरित त्याग करा. तेवढी बुद्धि तुमच्याकडे असायला हवी, खरा व खोटा गुरू कोण हे ओळखण्याइतपत. अन्यथा तुम्ही लुबाडले जाणार. आणि तसे होतही आहे. प्रत्येकजण स्वतःच्या मनाप्रमाणे अर्थ लावत आहे. भगवद्गीतेची हजारो संस्करणे आहेत, आणि त्यांत स्वतःच्या सोयीनुसार भगवद्गीतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे, निव्वळ मूर्खपणा. ती सर्व संस्करणे फेकून द्यायला हवीत. तुम्ही केवळ भगवद्गीता जशी आहे तशीच वाचली पाहिजे. मग तुम्हाला आकलन होईल. अर्थ लावण्याचा प्रश्नच नाही, अन्यथा विश्वासार्हता संपते. ज्याक्षणी तुम्ही काही वेगळा अर्थ लावता, तेव्हाच विश्वासार्हता संपुष्टात येते. कायदेपुस्तिका. जर तुम्ही कोर्टात न्यायाधीशांसमोर म्हणणार, "माय लॉर्ड, मी या परिच्छेदाचा अर्थ असा लावतो," तर ते स्वीकृत होईल का? न्यायाधीश त्वरित म्हणेल, "अर्थ लावणारा तू कोण? तुला काहीही अधिकार नाही." या कायदेपुस्तिकेची विश्वासार्हताच काय राहील जर प्रत्येकजण म्हणेल, "मी असा अर्थ लावतो"? आणि अर्थ लावणे केव्हा गरजेचे असते? जेव्हा एखादी गोष्ट समजत नाही तेव्हा. जर मी म्हणालो, "हे घड्याळ आहे," आणि प्रत्येकाला समजते "होय, हे घड्याळ आहे," तर मग 'हा चष्मा आहे' असा गैरअर्थ लावण्याची गरजच काय? जर एखादी स्पष्ट गोष्ट कोणालाही समजत असेल... जसे बायबलमध्ये, "भगवंत म्हणाले, 'निर्मिती होवो,' व निर्मिती झाली." आता यात अर्थ लावण्याचा प्रश्नच कोठे येतो? होय, भगवंतांनी निर्माण केले. तुम्ही नाही निर्माण करू शकत. मग यात अर्थ लावण्याची संधीच कोठे आहे? त्यामुळे विनाकारणच गैरअर्थ लावणे गरजेचे नाही व ते अधिकृतही नाही, आणि जे लोक विनाकारण गैरअर्थ लावतात, त्यांना तात्काळ नाकारले पाहिजे. तात्काळ, काही विचार न करता. भगवंत म्हणाले, "निर्मिती व्हावी." आणि निर्मिती झाली. साधी गोष्ट आहे. अर्थ लावण्याचा प्रश्न येतोच कुठे? येथे काय अर्थ लावला जाऊ शकतो? आता येथे काही अर्थ लावून दाखवा. बरोबर बोलतोय ना मी? बायबलच्या सुरुवातीला म्हटले आहे ना? "भगवंत म्हणाले, 'निर्मिती होवो,' आणि निर्मिती झाली." यात तुम्ही काय अर्थ लावणार? सांगा काय अर्थ लावणार. अर्थ लावण्याची काही शक्यता आहे? कोणी सुचवू शकेल? मग वेगळा अर्थ लावण्याची संधीच कुठे येते? एखादा अर्थ स्पष्ट करू शकतो. ती वेगळी गोष्ट आहे, पण तथ्य हे की भगवंतांनी निर्मिती केली, ते तसेच राहील. ते तुम्ही बदलू शकत नाही. आता, ही निर्मितीची प्रक्रिया कशी झाली, हे भागवतात स्पष्ट केले आहे : सर्वप्रथम आकाश अस्तित्वात होते, मग ध्वनी निर्माण झाला, मग हे, मग ते. ही निर्मितीची प्रक्रिया आहे, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण भगवंतांनी निर्मिती केली हे मूलभूत तथ्य कोणत्याही परिस्थितीत सारखेच राहील. मूर्ख वैज्ञानिकांप्रमाणे नाही, "अरे, सुरुवातीला एक गोळा होता व त्याचे तुकडे झाले, आणि त्यातून हे ग्रह अस्तित्वात आले. कदाचित हे आणि शक्यतो ते," हा सर्व मूर्खपणा. ते केवळ विचार करतील, "कदाचित," "शक्यतो." हे विज्ञान नाही - "कदाचित," "शक्यतो." कशाला कदाचित? येथे स्पष्ट विधान आहे, "ईश्वराने निर्माण केले." तेवढेच. बस.