MR/Prabhupada 0318 - सूर्यप्रकाशात या
Lecture on BG 4.22 -- Bombay, April 11, 1974
एक वैष्णव कधीही मत्सर करीत नाही. मत्सर म्हणजे... हे श्रीधर स्वामींनी स्पष्ट केले आहे. मत्सरता परा उत्कर्षणमसहनम् । हे भौतिक जग असे आहे की तुमचा स्वतःचा सख्खा भाऊ जरी समृद्ध झाला, तरी तुम्हाला ईर्ष्या होईल, "अरे, माझा भाऊ इतका समृद्ध झाला आहे. मी नाही होऊ शकत." या जगात हे स्वाभाविक आहे. ईर्ष्या. कारण आपली ईर्ष्या कृष्णांपासून सुरू झाली, "केवळ कृष्णच कशाला भोक्ता असावेत? मीसुद्धा भोग घेईल." आणि ईर्ष्या सुरू होते. त्यामुळे हे संपूर्ण भौतिक जीवन ईर्ष्येने भरलेले आहे. मी तुझी ईर्ष्या करतो, तू माझी ईर्ष्या करतोस. हेच भौतिक जगातील लोकांचे काम आहे. त्यामुळे येथे म्हटले आहे, विमत्सर, मत्सरहीन. एखादी व्यक्ती कृष्णांचा भक्त असल्याशिवाय मत्सरहीन कशाप्रकारे होऊ शकते? ती मत्सरीच असते. हा स्वभावच आहे. त्यामुळे श्रीभागवत म्हणते की धर्मः प्रोज्झितकैतवोsत्र परमो निर्मत्सराणाम्, वास्तवं वस्तु वेद्यमत्र । (श्री. भा. १.१.२) धर्म... जगात अनेक धर्म आहेत. त्यांच्यात ईर्ष्या आहे. तथाकथित धर्मांत, प्राण्यांचा गळा कापला जातो. का? जर तुम्ही इतकेच उदार मनाचे आहात की तुम्हाला सर्वत्र नारायण दिसतात, तर मग तुम्ही बकरी, गाय व अन्य प्राण्यांचे गळे का कापत आहात? तुम्ही त्यांच्याप्रतिसुद्धा दयाळू असायला हवे. परंतु तशी दया एक भक्त, विमत्सर, निर्मत्सर झाल्याशिवाय विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे हे मत्सरतेने युक्त असे तथाकथित धर्म, त्यांना कैतवधर्म, धर्माच्या नावावर लुबाडणे असे म्हणतात. त्यामुळे ही भगवद्भावना काही कैतवधर्म नाही. ती फारच उदार मनाची आहे. तितिक्षवः कारुणिकैः सुहृदः सर्वभूतानाम् (श्री. भा. ३.२५.२१). हे कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा मित्र व्हायचे आहे. अन्यथा जर एखाद्या कृष्णभावनाभावित व्यक्तीला तसे वाटत नसेल, तर मग तो अतिशय कष्टाने सर्व जगभर का कृष्णभावनामृताचा प्रचार करत फिरतो? विमत्सरः. प्रत्येकाने हे समजून घ्यायला हवे की ही कृष्णभावना इतकी चांगली आहे, की प्रत्येकाने तिचा आनंद घ्यायला हवा, प्रत्येकाने तिच्यात सहभाग घ्यायला हवा. कृष्णभावना म्हणजे भगवद्भावना. कारण भगवद्भावनेच्या अभावी लोक दुःखी होत आहेत. हेच दुःखांचे मूळ कारण आहे.
- कृष्णबहिर्मुख हञा भोग वाञ्छा करे ।
- निकटस्थ माया तारे जापटिया धरे ।।
- (प्रेम विवर्त)
हेच सूत्र आहे. ज्याक्षणी तुम्ही श्रीकृष्णांना विसरता, तत्क्षणीच माया तुम्हाला बद्ध करते. अगदी सूर्यप्रकाश व सावलीप्रमाणे, ते परस्परांच्या अगदी विरुद्ध असतात. जर तुम्ही सूर्यप्रकाशात नाहीत, तर याचा अर्थ असा की तुम्ही सावलीत, अंधारात आहात. आणि जेव्हा तुम्ही अंधारात नसता, तेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात येता. त्याचप्रमाणे, जर आपण कृष्णभावनेचा स्वीकार केला नाही, तर आपल्याला मायाभावनेचा स्वीकार करावा लागेल. आणि जर आपण मायाभावनेचा स्वीकार करणार नाहीत, तर आपल्याला कृष्णभावना स्वीकारावी लागेल. परस्परांहून भिन्न. त्यामुळे कृष्णभावना म्हणजे अंधाराच्या भावनेत न राहणे. तमसो मा ज्योतिर्गमय । हा वैदिक आदेश आहे, "अंधारात राहू नका." आणि अंधार काय आहे? जीवनाची स्वतःला देह समजण्याची संकल्पनाच अंधार आहे.