MR/Prabhupada 0322 - हे शरीर तुमच्या कर्मांनुसार भगवंतांकडून प्राप्त झाले आहे



Lecture on SB 1.15.40 -- Los Angeles, December 18, 1973

सर्वोच्च पित्याने आपल्याला दिलेले आहे, "आता हे तुमचे अमेरिका आहे. हा तुमचा भारत आहे." परंतु अमेरिकन किंवा भारतीयाचे काहीच नाही. ते पित्याचे, सर्वोच्च पित्याचे आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला ही जाणीव होत नाही, की "त्या पित्याने मला हे सर्वकाही दिले आहे, हे जे काही माझे आहे, ते खरेतर त्या पित्याचेच आहे..." याला म्हणतात कृष्णभावनामृत. याला म्हणतात कृष्णभावनामृत. त्यामुळे जे कृष्णभावनाभावित आहेत, या पूर्ण जाणिवेसह की "माझे काहीच नाही. सर्वकाही..." ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च (ईशोपनिषद मंत्र १). "अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तू, एक अणुसुद्धा भगवंतांचाच आहे. मी त्याचा मालक नाही." जर अशी जाणीव तुम्हाला आली, तर तुम्ही मुक्त आहात. हे भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे, मां च योsव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ।। (भ. गी. १४.२६). गुणमयी माया, प्रकृतीच्या गुणांनी आवृत होणे, हेच बंधन आहे. हेच बंधन आहे. परंतु जर कोणी भक्तीमध्ये मग्न असेल, तर तो कोणत्याही बंधनात नाही कारण तो सर्व गोष्टींना यथावत जाणतो. त्यामुळे... जसे की मी एक विदेशी आहे आणि मी... मी तुमच्या देशात आलो आहे. तर मग जर मी असा दावा केला की "हा देश माझा आहे," तर अडचण होईल. पण जर मला हे माहीत असेल की मी एक भेट देणारा म्हणून किंवा एक विदेशी म्हणून येथे आलो आहे, तर कोणतीही अडचण होणार नाही. मी मुक्तपणे फिरू शकेल. मी संयुक्त संस्थानाच्या सरकारच्या सर्व सुविधा मिळवू शकेल. त्यात काहीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे, आपणही या भौतिक जगात एक प्रवासी, एक अभ्यागत म्हणून आलो आहोत, आणि जर आपण असा दावा करू की "हे भौतिक जग माझे आहे," किंवा एखाद्या जनसमुदायाचे किंवा एखाद्या राष्ट्राचे आहे, तर ते अज्ञान आहे. त्यामुळे कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे हे अज्ञान दूर करणे, लोकांना बुद्धिमान बनवणे, की "काहीच तुमचे नाही. सर्वकाही भगवंतांचे आहे." तर येथे ही सामान्य प्रक्रिया आहे, वैराग्य, जी महाराज युधिष्ठिर सांगत आहेत... कारण जसे मी आधीच स्पष्ट केले आहे, की आपण अहंकाराच्या संकल्पनेत इतके गुरफटले गेलो आहोत, "मी हे शरीर आहे, आणि जे काही या शरीराशी संबंधित आहे ते सर्वकाही माझे आहे." हाच भ्रम आहे, मोह. याला म्हणतात मोह, भ्रम. जनस्य मोहोsयम् । मोह म्हणजे भ्रम. हा भ्रम आहे. हा भ्रम काय आहे? अहं ममेति : (श्री. भा. ५.५.८) "मी हे शरीर आहे, आणि या शरीराशी संबंधित असलेले सर्वकाही माझे आहे." याला म्हणतात मोह, भ्रम. हे शरीरही आपले नाही, कारण हे शरीर आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे भगवंतांकडून मिळालेले आहे. जसे की तुम्ही जी किंमत देता त्यानुसार घरमालक तुम्हाला राहायला घर देतो. ते घर तुमचे नसते. हे एक तथ्य आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे डॉलर देणार, तर तुम्हाला खूपच छान व चांगले घर मिळेल. आणि जर तुम्ही पंचवीस डॉलर देणार, तर तुम्हाला दुसरे घर मिळेल. त्याचप्रमाणे, आपली ही विविध प्रकारची शरीरे... प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. हे सुद्धा घरच आहे. खरेतर, हे शरीर घर आहे, कारण मी या शरीरात राहत आहे, परंतु मी हे शरीर नाही. ही भगवद्गीतेची शिकवण आहे. देहिनोsस्मिन्यथा देहे (भ. गी. २.१३). अस्मिन् देहे, या देहात, देही, हा राहणारा आहे, मालक नाही. राहणारा. जसे की एक घर, एक सदनिका, त्या घरात राहणारा कोणीतरी असतो व त्याचा मालक कोणीतरी दुसरा असतो. त्याचप्रमाणे हे शरीरही एक घरच आहे. मी आत्मा आहे, या घरात राहणारा आहे. मी त्याच्यात मी दिलेल्या किमतीप्रमाणे म्हणजेच माझ्या कर्मांप्रमाणे राहत आहे.