MR/Prabhupada 0374 - भजहू रे मनचे तात्पर्य, भाग एक



Purport to Bhajahu Re Mana -- San Francisco, March 16, 1967

भजहू रे मन श्री-नंद-नंदन-अभय चरणारविंद रे. भज, भज म्हणजे पूजा; हू, नमस्ते; मन, मन. कवी गोविंद दास, महान तत्वज्ञ आणि प्रभूचा भक्त, ते प्रार्थना करीत आहेत. ते त्यांच्या मनाला विनंती करीत आहेत, कारण प्रत्येकाचे मन हे मित्र आहे आणि शत्रूही आहे. जर एखादा कृष्णभावनामृतमध्ये आपले मन प्रशिक्षित करू शकला, तर तो यशस्वी होतो. जर तो आपल्या मनाला प्रशिक्षित करू शकत नसेल, तर आयुष्य अयशस्वी ठरते. म्हणून गोविंद दास, कृष्णाचा महान भक्त… गोविंद दास, त्यांचे नाव सुचवते. गोविंद, कृष्ण, आणि दास म्हणजे सेवक. हि सर्व भक्तांची वृत्ती आहे. ते नेहमी नावा पुढे दास जोडतात, दास म्हणजे सेवक.

म्हणून गोविंद दास प्रार्थना करीत आहेत, "माझ्या प्रिय मना, कृपया तू नंदाच्या पुत्राची पूजा करण्याचा प्रयत्न कर, जो अभय-चरण आहे, ज्याचे पदकमल सुरक्षित आहे. तिथे कोणतीही भीती नाही." अभय. अभय म्हणजे तिथे भीती नाही, आणि चरण. चरण म्हणजे पदकमल. म्हणून ते त्यांच्या मनाला सल्ला देत आहेत, "माझ्या प्रेमळ मना, कृपया, नंदाचा पुत्रच्या निर्भय पदकमलांची पूजा करण्यात तू स्वतःला गुंतवून घे." भजहू रे मन श्री-नंद-नंदन. नंद-नंदन म्हणजे नंद महाराजांचा पुत्र, कृष्ण. आणि त्याचे पदकमल अभय आहे, निर्भय म्हणून गोविंद दास मनाला विंनती करीत आहे, "कृपया कृष्णाच्या पदकमलांच्या दिव्य प्रेममयी सेवेत गुंतून रहा." जिथपर्यंत इतर गोष्टींचा संबंध आहे… आणि ते असे सुद्धा सांगतात की दुर्लभ मानव-जन्म.

दुर्लभ म्हणजे फार दुर्मिळ. मानव-जन्म म्हणजे हे मनुष्य जीवन. ते खूप मोठया जन्म मृत्यूच्या चक्रानंतर येते. एक संधी कृष्णभावनामृत बनण्याची दिली जाते जेणे करून एखादा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकेल. म्हणून ते सल्ला देतात की हे जीवन, हे मनुष्य जीवन, खूप महत्वाचे आहे, दुर्लभ. दुर्लभ म्हणजे… दु म्हणजे खूप कठीण, आणि लभ म्हणजे प्राप्य.

तर मूर्ख लोक, त्यांना माहित नाही किती, कसे हे मनुष्य जीवन महत्वाचे आहे. ते केवळ जनावरांप्रमाणे इंद्रियतृप्ती करण्यात वाया घालवत आहेत. तर हि खूप चांगली शिकवण आहे, की ते त्यांच्या मनाला प्रशिक्षण देत आहेत की "श्रीकृष्णाची पूजा करण्यात तू तुझ्या मनाला गुंतव." दुर्लभ मानव-जनम सत-संगे. आणि हे मनाला प्रशिक्षण देणं चांगल्या संगात शक्य आहे, सत-संग. सत-संग म्हणजे जे लोक केवळ, शंभर टक्के, देवाच्या सेवेत व्यस्त आहेत. त्यांना सत म्हणतात. सतां प्रसंगात. भक्तांच्या संगाशिवाय, मनाला प्रशिक्षित करणे अशक्य आहे. तथाकथित योग प्रणाली किंवा ध्यानाने हे शक्य नाही.

भक्तांचा संग असणे आवश्यक आहे; नाहीतर ते शक्य नाही. म्हणून आम्ही हि कृष्णभावनामृत संस्था स्थापन केली आहे. जेणेकरून कोणीही या संगाचा फायदा घेऊ शकेल. तर गोविंद दास, कवी आणि भक्त, सल्ला देतात. दुर्लभ मानव-जनम सत-संगे: तुला हे खूप चांगले, दुर्मिळ मनुष्य शरीर लाभले आहे. आता भक्तांचा संग कर आणि तुझे मन कृष्णाच्या निर्भय पदकमलांशी गुंतव." ते आपल्या मनाला विंनती करीत आहेत. मग ते जीवनाची निराशा दर्शवत आहेत. ती काय आहे? शीत आतप बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. शीत म्हणजे हिवाळा. आतप म्हणजे उन्हाळा, जेव्हा प्रखर सूर्यप्रकाश असतो. शीत आतप बात, थंडी, बरिषण, मुसळधार पाऊस. हि अशांतता नेहमीच असते. काहीवेळा कडाक्याची थंडी असते. काहीवेळा कडक उन्हाळा असतो. काहीवेळा मुसळधार पाऊस असतो. कधी हे कधी ते चालू असते. तर ते सांगतात, शीत आतप बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. संपूर्ण दिवस आणि रात्र, लोक कसलाही विचार न करता कठीण परिश्रम करीत आहेत. कडाक्याची थंडी, कडक उन्हाळा, आणि मुसळधार पाऊस, आणि रात्री, वाळवंटात जातात, समुद्राच्या तळाशी जातात - सर्वत्र ते इतके व्यस्त आहेत.

शीत आतप बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. रात्रीचे काम आहे, आणि इतर अनेक कार्यक्रम आहेत. तर ते सांगतात, शीत आतप बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. बीफले सेविनु कृपण दुर्जन चपल सुख-लब लागी रे. "आता, या सर्व परिश्रमाने, मी काय केले आहे? मी काही व्यक्तींची सेवा केली जे माझ्या कृष्णभावनामृत असण्याला अनुकूल नाहीत. आणि मी का त्यांची सेवा केली?" चपल सुख-लब लागी रे: "चपल, चंचल सुख, जर मी विचार करतो जर माझ्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर हसू आले, तर मी आनंदी होईन. मला वाटते जर माझी बायको प्रसन्न झाली, तर मी आनंदी आहे. पण हे सर्व तात्पुरते हसणे किंवा आनंदी वाटणे, ते सर्व चंचल आहे." हे आपण जाणले पाहिजे. असे अनेक कवी आहेत, याचप्रमाणे गायले आहेत की हे… हे मन वाळवंटाप्रमाणे आहे, आणि ते महासागराच्या पाण्याच्या शोधात धावत आहे.

वाळवंटात, जर महासागर स्थानांतरित केला, तर ते भरून जाईल. आणि एका पाण्याच्या थेंबाचा काय फायदा हाऊ शकतो? त्याचप्रमाणे, आपले मन, आपली चेतना, महासागराच्या पाण्याच्या शोधात धावत आहे. आणि हा कौटुंबिक जीवनातील, सामाजिक जीवनातील, तात्पुरता आनंद तो पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. तर जे तत्वज्ञानी आहेत, ज्यांनी खरोखरच जागतिक परिस्थितीचा अभ्यास केला आहे, ते समजू शकतात की "हा क्षणिक आनंद मला सुखी करू शकणार नाही. नंतर ते सांगतात, कमल-दल-जल, जीवन तलमल. कमल-दल-जल म्हणजे लिली, लिलीचे फुल. तुम्ही सगळ्यांनी लिलीचे फुल सरोवरात बघितले आहे. ते नेहमी पाण्यावर थरथरते, थरथरते. कधीही, कोणत्याही वेळी, ते डुबू शकेल. त्याचप्रमाणे, हे आयुष्य नेहमी संकटांनी भरलेले आहे, कायम संकटात. कोणत्याही क्षणी ते संपून जाऊ शकते. अशी बरीच उदाहरणे आहेत. लोक ते बघतात, पण ते विसरतात. ती आश्चर्यकारक गोष्ट आहे. ते प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, बघत आहेत की तो स्वतः संकटात आहे इतरही संकटात आहेत. तरीही, ते विचार करतात की "मी सुरक्षित आहे." हि स्थिती आहे.