MR/Prabhupada 0353 - कृष्णासाठी लिहा , वाचा , बोला , विचार , पूजा , जेवण , भोजन करा - तेच कृष्ण कीर्तन आहे
Lecture on SB 2.1.2 -- Vrndavana, March 17, 1974
म्हणूनच, आपण या तथाकथित गोस्वामींपेक्षा भिन्न असायला हवे. ते लोक , जे वृंदावनात राहतील ... खरेतर सर्वत्रच. सर्वत्र वृंदावनच आहे. जिथे जिथे श्रीकृष्णांचे मंदिर आहे, त्यांच्या नावांचे संकीर्तन आहे, ते वृंदावनच आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात "माझे मन सदैव वृंदावनच आहे." कारण ते सदैव कृष्णांचाच विचार करत असत. कृष्ण खरोखर आहेत त्यांचा मनात ― वस्तुतः ते तर स्वतः कृष्णच आहेत―आपल्याला शिकवण्यासाठी (ते महाप्रभू झालेत) त्याचप्रकारे, तुम्ही कुठेही असा, जिथे तुम्ही खरोखर कृष्णांच्या शिक्षेचे अनुसरण करत असाल, ज्याप्रमाणे कृष्ण सांगतात,
- मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु (भ गी १८।६५)
तर मग ते वृंदावन आहे, जरी तुम्ही भौतिकदृष्ट्या कुठेही असा. असे नका समजू की, "येथे मेलबर्न मध्ये हे मंदिर आहे, हे श्रीविग्रह येथे मेलबर्न मध्ये आहेत, त्यामुळे हे वृंदावन नाही." हेदेखील वृंदावनच आहे. जर तुम्ही श्रीविग्रहांची अगदी काटेकोरपणे सेवा कराल, सर्व नियमांचे यथायोग्य पालन कराल, तर मग ते कोठेही असो, ते वृन्दावनच आहे. विशेषतः या वृन्दावन धामात, जिथे कृष्ण स्वतः अवतीर्ण झाले. हे वृन्दावन आहे, गोलोक वृन्दावन. इथे, ते लोक जे या संस्थांचे संचालन करतील, ते सर्वजण प्रथम श्रेणीतील गोस्वामी असायला हवेत. हे माझे मत आहे. गृहमेधी (आसक्त गृहस्थ ) नव्हे, गोस्वामी. जसे... कारण या स्थानाचे पुनरुत्थान गोस्वामींनी केले होते... षडगोस्वामींनी. येथे सनातन गोस्वामी आलेत, त्यानंतर रूप गोस्वामी आलेत. आणि मग त्यानंतर इतर गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, सर्वजण एकत्र आलेत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या आदेशांचे पालन करण्यासाठी - कृष्णांविषयी, त्यांच्या लीलांविषयी ग्रंथ लिहिण्यासाठी ; खूप, अर्थातच, उच्च कोटीच्या आध्यात्मिक पातळीवरचे ग्रंथ लिहिले त्यांनी. नाना-शास्त्र-विचारणैक-निपुणौ सद्धर्म-संस्थापकौ.
हि गोस्वामींची कार्ये आहेत, त्यांची लक्षणे. सर्वप्रथम लक्षण हे, कृष्णोत्कीर्तन-गान-नर्तन-परौ. ते सदैव कृष्ण-कीर्तनात व्यस्त असत. कृष्ण-कीर्तन म्हणजे... जसे आपण मृदंग, टाळ या सर्वांनी कीर्तन करतो, तेही कीर्तनच आहे. आणि ग्रंथ लिहिणे, तेही कीर्तनच आहे. आणि ग्रंथ वाचणे, तेसुद्धा कृष्ण-कीर्तनच आहे. असे नाही की फक्त हे टाळ-मृदंगाचे कीर्तनच कीर्तन आहे. जर तुम्ही कृष्णांबद्दल ग्रंथ रचणार, कृष्णांबद्दल वाचणार, कृष्णांबद्दल बोलणार, कृष्णांचाच विचार करणार, कृष्णांची आराधना करणार, कृष्णांसाठी नैवेद्य शिजवणार, कृष्णांच्या प्रसादाची सेवा करणार, तर तेसुद्धा कृष्ण-कीर्तनच आहे. म्हणूनच गोस्वामी म्हणजे चोवीस तास कृष्ण-कीर्तनात रममाण राहणे, या किंवा त्या प्रकारे. कृष्णोत्कीर्तन-गान-नर्तन-परौ. कशा रितीने? प्रेमामृतांभोनिधी. कारण ते सदैव कृष्ण-प्रेमाच्या समुद्रात बुडालेले असत. जोपर्यंत आपल्या मनात कृष्णांबद्दल प्रेम जागृत होत नाही, तोपर्यंत आपण केवळ कृष्णांचीच सेवा करण्यात कसे काय समाधानी व तृप्त राहणार? ते शक्य नाही. ज्यांच्या मनात कृष्णांविषयी प्रेम जागृत झाले नाही, ते लोक चोवीस तास कृष्णांच्या सेवेत रममाण राहू शकत नाहीत. आपण याबद्दल विचार करायला हवा... आपण सदैव वेळेची बचत केली पाहिजे, कृष्णांच्या सेवेत मग्न राहण्यासाठी. ज्यावेळी आपण झोपतो, तो काळ व्यर्थ जातो. वाया जातो. म्हणून आपण काळ वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा.
- कीर्तनीयः सदा हरिः (चै च अादि १७।३१).
हरी हे श्रीकृष्णांचे एक नाव आहे. सदा, चोवीस तास. खरेतर, गोस्वामी हे करत असत. ते आपल्यासाठी एक उदाहरण स्वरूप आहेत. ते दोन तासांपेक्षा जास्त झोपत नसत, जास्तीत जास्त तीन तास. म्हणूनच, निद्राहारविहारकादिविजितौ. त्यांनी विजय मिळवला... यालाच गोस्वामी म्हणतात. त्यांनी या सर्व गोष्टींवर विजय मिळवला. कोणत्या गोष्टींवर? निद्राहार, निद्रा, आहार, विहार. विहार म्हणजे इंद्रियांच्या सुखांचा उपभोग, आणि आहार म्हणजे खाणे व गोळा करणे. सामान्यतः, खाणे, आहार. आणि निद्रा.
निद्राहारविहारकादिविजितौ.
विजय मिळवला. याला म्हणतात वैष्णव. असे नाही की चोवीस तासातून, छत्तीस तास झोपणे. आणि वरून स्वतःला गोस्वामी म्हणवून घेणे. हे काय गोस्वामी आहेत? गोदास. ते तर गोदास आहेत. गो म्हणजे इंद्रिये, आणि दास म्हणजे सेवक. त्यामुळे, आपले ध्येय असायला हवे की, इंद्रियांचा दास होण्याएवजी, आपण कृष्णांचा दास व्हायला हवे. याला खरोखर गोस्वामी म्हणतात. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत इंद्रिये तुम्हाला नेहमीच सांगतील, "आता जेवण कर, आता झोप, आता कामुक कृत्य कर. हे कर, ते कर. " हे भौतिक जीवन आहे. हे भौतिक जीवन आहे, इंद्रियांच्या मागण्यांना बळी पडणारे. हे भौतिक जीवन आहे. आणि आपल्याला व्हायचे आहे... गोस्वामी.
अर्थातच, मन सदैव मागणी करते, "कृपया आणखी खा, आणखी झोप, आणखी सम्भोग कर, कृपया भविष्यासाठी आणखी पैसा गोळा कर... " असा हा भौतिकवाद आहे. भविष्यासाठी पैशाचा साठा करून ठेवणे. हा पैशाचा साठा करणे... हा भौतिकवाद आहे. आणि अध्यात्मवाद म्हणजे, "नाही, हे नव्हे." निद्राहार. इंद्रिये सदैव मागणी करत असतात, "हे कर, ते कर, ते कर,"आणि तुम्हाला खूप समर्थ व्हावे लागेल. ज्यामुळे तुम्ही तात्काळ प्रत्युत्तर द्याल, "नाही, हे अयोग्य आहे." मग गोस्वामी. यास गोस्वामी म्हणतात. आणि यांच्या विपरीत गृहमेधी. ते अगदी गृहस्थासारखेच वाटतात. परंतु गृहस्थ म्हणजे इंद्रियांप्रमाणे वागणे नव्हे. मग तुम्ही गोस्वामी व्हाल. ज्याप्रकारे नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, गृहे वा बनेते थाके हा गौरांग बले ड़ाके. हा गौरांग, "सदैव निताई गौर या नावांचे कीर्तन करणे, आणि निताई गौरांचा विचार करणे," अशी व्यक्ती, नरोत्तम दास ठाकूर म्हणतात... गृहे वा... "ती व्यक्ती संन्यासी असो, किंवा गृहस्थ, ते महत्त्वाचे नाही. कारण तो निताई गौरांच्या विचारात मग्न आहे." म्हणूनच, नरोत्तम मागे तांर संग: "नरोत्तम सदैव त्यांच्या संगतीची इच्छा धरतो. " गृहे वा वनेते थाके, हा गौरांग बले ड़ाके, नरोत्तम मागे तांर संग. नरोत्तम सदैव त्यांच्या सहवासाची इच्छा करतात.
कृष्णोत्कीर्तनगाननर्तनपरौ प्रेमामृतांभोनिधी धीराधीरजनप्रियौ.
आणि गोस्वामी सर्व स्तरावरील लोकांना अत्यंत प्रिय असायला हवेत. मनुष्यांचे दोन स्तर आहेत, धीर आणि अधीर. धीर म्हणजे ज्याने त्याच्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे, आणि अधीर म्हणजे ज्याने मिळवला नाही. गोस्वामी सर्व प्रकारच्या लोकांसाठी दयाळू असतात. धीराधीरजनप्रियौ. तर मग गोस्वामी अशा प्रकारे कसे होऊ शकतील? जेव्हा षड्गोस्वामी येथे वृंदावनात होते, तेव्हा ते सर्व लोकांत अतिशय प्रसिद्ध होते. या वृंदावन-धामातही, ग्रामीण लोक, जर त्यांचात काही वाद झाला, पती व पत्नी या दोघांमध्ये, तर ते दोघे सनातन गोस्वामींकडे जात, "प्रभु, आम्हा दोघांत काही विवाद झाला आहे. तुम्ही कृपया तो सोडवा." आणि सनातन गोस्वामी न्याय करत, "तू अयोग्य आहेस." बस. ते लोक स्वीकारत. पहा किती प्रसिद्ध होते ते. सनातन गोस्वामी त्यांच्या पारिवारिक वादातही निर्णय देत. म्हणूनच, धीराधीरजनप्रियौ. ते सामान्य लोक, ते फार महान नव्हते, पण ते सनातन गोस्वामींना समर्पित होते. त्यामुळे त्यांची जीवने सफल होती. कारण ते सनातन गोस्वामींच्या आदेशांचे पालन करत, त्यामुळे तेसुद्धा मुक्त होते.
ते वैयक्तिकरित्या चुकीचे असू शकतील, पण त्यांनी सनातन गोस्वामींच्या आदेशांचे पालन केले. आणि सनातन गोस्वामी त्यांच्याप्रती दयाळू होते. याला म्हणतात गोस्वामी. तुम्हीसुद्धा त्यांना बोलवू शकता, त्यांना प्रसाद द्या, त्यांच्याशी चांगले वागा. ""हे हरेकृष्ण कीर्तन ऐका. या, हरेकृष्ण या नावांचे कीर्तन करा. हा प्रसाद घ्या." मग ते तुमच्या..., तुमच्या नियंत्रणात येतील. ते तुमच्या नियंत्रणात राहतील. आणि ज्या क्षणी ते तुमच्या नियंत्रणात येतील, तात्काळ त्यांची उन्नती होईल. कारण एखाद्या वैष्णवाच्या आज्ञेत कोणी राहण्यास तयार होईल, तर मग तो... याला अज्ञात-सुकृती म्हणतात. कारण तो तुम्हाला... जसे जेव्हा ते रस्त्याने जातात, ते म्हणतात,
"हरेकृष्ण. जय राधे."
ही आदर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे जर एखादी सामान्य व्यक्ती वैष्णवाचा सन्मान करते, तर ती उन्नत होते. त्यामुळे तुम्ही वैष्णव व्हायला हवे. अन्यथा ते तुम्हाला सन्मान का देतील? सन्मानाची मागणी करता येत नाही, तो मिळवावा लागतो. तुम्हाला पाहून ते तुमचा आदर करतील. मग धीराधीरजनप्रियौ. याला म्हणतात गोस्वामी.
धन्यवाद.
भक्त: जय श्रील प्रभुपाद !