MR/Prabhupada 0324 - इतिहास म्हणजे प्रथम श्रेणीतील लोकांचे चरित्र जाणून घेणे
Lecture on SB 6.1.20 -- Chicago, July 4, 1975
आणि हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र आहे. असे नाही की तेथे युद्ध झाले व तेथे कृष्ण होते म्हणून ते धर्मक्षेत्र म्हटले जाते. काही वेळा असा अर्थ घेतला जातो. पण खरेतर कुरुक्षेत्र हे फार फार पूर्वीपासून धर्मक्षेत्र होते. वेदांमध्ये असे म्हटले आहे, कुरुक्षेत्रे धर्ममाचरेत् : "जर एखाद्याला धार्मिक विधी पार पाडायची असेल, तर त्याने कुरुक्षेत्राला जावे." आणि भारतात अजूनही अशी पद्धत आहे की जर दोन गटांमध्ये विवाद उत्पन्न झाला, तर ते मंदिरात जात असत - मंदिर हे धर्मक्षेत्र आहे - जेणेकरून कोणी देवासमोर खोटे बोलणार नाही. असे अजूनही चालू आहे. प्रत्येकजण खालच्या मानसिकतेचा असतो, तरीही, जर त्याला असे आव्हान देण्यात आले, की "तू हे खोटे बोलत आहेस. हेच तू देवासमोर बोलून दाखव," तर तो नाकारत असे, "नाही." असे अजूनही भारतात आहे. तुम्ही देवासमोर खोटे बोलू शकत नाही. ते पाप आहे. असा विचार करू नका की मूर्ती केवळ दगडाचा पुतळा आहे. नाही. स्वयं भगवान्. जसे की चैतन्य महाप्रभू. ज्या क्षणी त्यांनी भगवान जगन्नाथांचा श्रीविग्रह पाहिला, ते तत्क्षणीच मूर्च्छित झाले. "अरे, माझे स्वामी येथे आहेत." आपल्याप्रमाणे नाही, "अरे, येथे एक पुतळा आहे." नाही. हा प्रश्न दृष्टिकोनाचा आहे. तुमचा दृष्टिकोन कोणताही असो, भगवंतांचा श्रीविग्रह हे स्वतः श्रीभगवंतच असतात. हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे आपण मूर्तीसमोर नेहमीच सावध राहू, आपण अपराध करणार नाहीत. त्यांची सेवा करताना, त्यांना प्रसाद समर्पण करताना, त्यांना वस्त्र परिधान करवितांना, आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, "स्वतः श्रीकृष्ण येथे आहेत." ते स्वतःच आहेत, परंतु ज्ञानाच्या अभावी आपण ते समजू शकत नाही. त्यामुळे शास्त्रांतील प्रत्येक गोष्टीचे आपण पालन केले पाहिजे. याला म्हणतात ब्राह्मण संस्कृती. हे कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे ब्राह्मण संस्कृती - प्रथम श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लोकांची संस्कृती. मनुष्य समाजात ब्राह्मणाला प्रथम श्रेणीतील मनुष्य समजले जाते. त्यामुळेच कृष्ण म्हणतात, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः (भ. गी. ४.१३). इतिहासाचा खरा अर्थ म्हणजे प्रथम श्रेणीतील मनुष्याचे चरित्र जाणून घेणे. तोच इतिहास आहे. त्यात सर्वात महत्त्वाच्या घटना स्वीकारल्या जातात. त्यामुळेच येथे उदाहरण दिलेले आहे की उदाहरन्ति इममितिहासं पुरातनम् । कारण ती सर्वोच्च श्रेणीतील घटना आहे... अन्यथा, जर तुम्ही संपूर्ण काळाच्या इतिहासाची नोंद ठेवणार, तर कोठे, कोण वाचेल ते, आणि ते कोणाला आवडेल, आणि तुम्ही ते सर्व कोठे ठेवणार? दररोज कित्येक गोष्टी होत आहेत. त्यामुळे, वैदिक पद्धतीनुसार, केवळ सर्वात महत्त्वाच्या घटनाच इतिहासात नोंदविल्या जातात. त्यामुळेच त्याला पुराण असे म्हणतात. पुराण म्हणजे फार जुना इतिहास. पुरातनम्. पुरातनम् म्हणजे खूप खूप जुने. ते नोंदविले जाते. त्यामुळे हे श्रीमद्भागवत फार जुन्या इतिहासाचा, ऐतिहासिक घटनांचा एक संग्रह आहे. इतिहासपुराणानां सारं सारं समुद्धृत्य । सारम् म्हणजे सार. सर्वच निरर्थक गोष्टींची नोंद करायला हवी असे नाही. नाही. सारं सारम्, केवळ जे महत्त्वाचे आहे, सारगर्भित आहे, तेच नोंदविले जाते. यालाच म्हणतात भारतीय इतिहास. महाभारत... महा म्हणजे महान भारत. महान भारत, तेथे अनेक घटना झाल्या, पण केवळ सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटना, कुरुक्षेत्राचे युद्ध, त्यात आहे. असे नाही की सर्वच युद्धांची नोंद ठेवली गेली पाहिजे.