MR/Prabhupada 0326 - भगवंत हेच सर्वोच्च पिता, सर्वोच्च मालक व सर्वोच्च मित्र आहेत



Lecture on BG 2.13 -- Pittsburgh, September 8, 1972

आता, हा आत्मा कशाप्रकारे देहान्तर करीत आहे? समजा या जन्मानंतर, मला एक चांगला जन्म प्राप्त झाला, तर ते चांगले आहे. पण जर मला खालच्या दर्जाचा जन्म प्राप्त झाला, तर काय परिस्थिती असेल? समजा मला पुढचा जन्म एका मांजरीचा, कुत्र्याचा, किंवा गायीचा प्राप्त झाला. समजा तुम्हाला पुन्हा अमेरिकेत जन्म मिळाला. पण तुमचे शरीर बदलते, मग सर्वच परिस्थिती बदलते. एका मनुष्याच्या रूपात तुम्हाला शासनाकडून संरक्षण मिळते, पण ज्याक्षणी तुम्ही दुसऱ्या शरीरात, जसे की एक वृक्ष किंवा प्राण्यांच्या शरीरात जाता, तेव्हा वागणूक वेगळी असते. प्राणी कत्तलखान्यात जात आहेत; वृक्ष कापले जात आहेत. परंतु कोणीही विरोध करत नाही. तर भौतिक जीवनाची हीच परिस्थिती आहे. काहीवेळा आपल्याला जीवनाची चांगली परिस्थिती प्राप्त होते, काहीवेळा वाईट परिस्थिती प्राप्त होते. यात कोणतीही शाश्वती नाही. हे सर्व आपल्या कर्मांवर अवलंबून आहे. हे व्यावहारिक आहे. या जीवनातही, जर तुम्ही शिक्षित झालात तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. पण जर तुम्ही शिक्षित नसाल, तर तुमचे भविष्य उज्ज्वल असणार नाही. त्याचप्रमाणे, या मानवी जीवनात आपण सततच्या जन्म व मरणाच्या समस्येची सोडवणूक करू शकतो. आणि मानवी जीवनाचा केवळ तोच उद्देश आहे, जीवनाच्या जन्म, मृत्यू, वृद्धावस्था व रोग या भौतिक परिस्थितीतून बाहेर कसे यावे. आपण याची सोडवणूक करू शकतो. आणि ती सोडवणूक म्हणजेच कृष्णभावनामृत. ज्याक्षणी आपण कृष्णभावनाभावित होतो... कृष्णभावनाभावित म्हणजे कृष्ण, परमेश्वर, हेच स्वामी आहेत, भगवंत आहेत. आपण सर्वजण कृष्णांचे अंश आहोत. हेच कृष्णभावनामृत आहे. केवळ समजून घेणे. हे की... जसे तुम्ही तुमचे वडील, आणि तुमचे भाऊ व स्वतःला समजून घेता तुम्ही सर्वजण पुत्र व पिता आहात. त्यामुळे समजून घेण्यात काहीच अडचण नाही. ज्याप्रमाणे वडील सर्व परिवार चालवतात, त्याचप्रमाणे, कृष्ण, जे सर्वोच्च पिता, भगवंत आहेत, त्यांना असंख्य अपत्ये आहेत, जे आहेत जीव. आणि ते त्यांच्या या संपूर्ण परिवाराला चालवत आहेत. यात कठीण काय आहे? यानंतरचे कर्तव्य आहे आपली जाणीव विकसित करणे. जसे की एक सुपुत्र, जेव्हा त्याला वाटते की "वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. मी त्याची परतफेड करायला हवी, किंवा किमान मी त्यांनी माझ्यासाठी जे केले आहे ते मान्य तरी करायला हवे," ही जाणीव म्हणजेच कृष्णभावनामृत. त्यामुळे कृष्णभावनाभावित होण्यासाठी आपल्याला केवळ तीनच गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे :

भोक्तारं यज्ञतपसां
सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।
(भ. गी. ५.२९)

आपल्यापैकी प्रत्येकजण आनंदी व संतुष्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. तोच अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे. पण जर आपण या तीन गोष्टी समजून घेऊ, की भगवंत हेच सर्वोच्च पिता आहेत, भगवंत हेच सर्वोच्च मालक आहेत, भगवंत हेच सर्वोच्च मित्र आहेत, केवळ या तीन गोष्टी, जर तुम्ही समजून घेणार, तर तुम्ही त्वरितच शांतीपूर्ण होणार. त्वरितच. तुम्ही खूप सगळ्या मित्रांकडून मदत मागता. पण जर तुम्ही केवळ भगवंत, कृष्णांना तुमचे मित्र, सर्वोच्च मित्र म्हणून स्वीकारणार, तर तुमच्या मैत्रीचा प्रश्न कायमचा सुटून जाईल. त्याचप्रमाणे, जर आपण भगवंतांना सर्वोच्च मालक म्हणून स्वीकारले, तर आपला दुसरा प्रश्नही सुटतो. कारण ज्या गोष्टी भगवंतांच्या आहेत त्यांच्यावर आपण खोटेपणाने आपली मालकी सांगत आहोत. खोटेपणाने असा दावा करून की "हे अमेरिकेचे भूक्षेत्र अमेरिकन लोकांचे आहे; आफ्रिकेची भूमी आफ्रिकन लोकांची आहे." नाही. प्रत्येक भूमी भगवंतांची आहे. आपण भगवंतांची वेगवेगळ्या वेशांतील वेगवेगळी मुले आहोत. इतरांच्या हक्कांवर गदा न आणता आपल्या पित्याच्या, भगवंतांच्या मालकीच्या आपल्या हिश्श्यातील गोष्टींचा उपभोग घेणे एवढाच आपला अधिकार आहे. ज्याप्रमाणे एका कुटुंबात आपण राहतो, तेथे अनेक भाऊ असतात. त्यामुळे जेवढे आपले आईवडील खायला देतात, तेवढेच आपण खातो. आपण इतरांच्या ताटातले हिसकावून खात नाहीत. अन्यथा ते सभ्य कुटुंब असणार नाही. त्याचप्रमाणे, जर आपण भगवद्भावनाभावित झालो, जर आपण कृष्णभावनाभावित झालो, तर या जगाच्या सर्व समस्या - सामाजिक, धार्मिक, आर्थिक विकासासंबंधातील, राजकीय - सोडवल्या जातील. हे एक तथ्य आहे. त्यामुळेच आम्ही हे कृष्णभावनामृत आंदोलन पसरविण्याचा प्रयत्न करीत आहोत, या मनुष्य समाजाच्या संपूर्ण लाभासाठी. आम्ही बुद्धिमान लोकांना, विशेषत्वे विद्यार्थीवर्गाला या आंदोलनात सहभागी होण्याची व हे आंदोलन काय आहे हे अतिशय वैज्ञानिक पद्धतीने समजून घेण्याची विनंती करीत आहोत. आमची अनेक मोठी मोठी पुस्तके आहेत, किमान दोन डझन मोठी मोठी अनेक खंडांची पुस्तके आहेत. तुम्ही ती वाचू शकता, या आंदोलनाला जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.