MR/Prabhupada 0358 - या जन्मात आपण समस्यांचे निराकरण केले पाहिजे. पुन्हा नाही. पुन्हा परत येणे नाही
Lecture on BG 7.14 -- Hamburg, September 8, 1969
आपण मृत्यूला कसे सामोरे जावे? कुत्र्या मांजरांप्रमाणे? मग या मनुष्य देहाचा उपयोगच काय? कुत्र्यांना आणि मजुरांनाही शरीर मिळाले आहे. त्यांनाही मृत्यू आहे. आणि मला शरीर मिळाले आहे. मला देखील मृत्यू आहे. तर मग काय मी कुत्र्यामांजरांप्रमाणे मरण पावण्यासाठी अस्तित्वात आहे? मग मी कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे? नाही. शास्त्र म्हणते की लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते. कित्येक प्रकारच्या शरीराच्या उत्क्रांतीनंतर… तुम्हाला उत्क्रांतीचा सिद्धांत माहीत आहे. तो अगदी पूर्णपणे डार्विनच्या सिद्धांतासारखा नाही, परंतु उत्क्रांतीची प्रक्रिया मात्र अस्तित्वात आहे. ते वैदिक साहित्यात स्वीकारण्यात आले आहे. पशु जीवनाच्या अविकसित स्तरापासून ते विकसित स्तरापर्यंत.
तर हे मनुष्य जीवन जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्याला हे मनुष्य जीवन अनेक जीवनाच्या खालच्या स्तरानंतर मिळाले आहे. लब्ध्वा सुदुर्लभम्. आणि ते फार दुर्मिळ आहे. तुम्ही मोजून पहा, जे कोणी जैविकशास्त्रज्ञ असतील, तुम्ही मोजून पहा सजीवांच्या किती प्रजाती आहेत ते. त्या एकूण ८४००,००० प्रजाती आहेत. त्यांपैकी मनुष्य ही प्रजाती अतिशय कमी संख्येत आढळते. ८४००,०००, प्रजातींपैकी मनुष्य या प्रजातीची संख्या केवळ ४००,००० आहे, इतर प्रजातींच्या तुलनेत, अतिशय कमी प्रमाणात. त्यांच्यातही, खूप असंस्कृत लोक आहेत. ते तर जवळजवळ पशूच आहेत. त्यानंतर सुसंस्कृत मनुष्य आहेत, जसे की आपण सर्व. त्यांपैकीही, त्यांना माहीत नाही... खूप जण, त्यांना माहीत नाही की आध्यात्मिक जीवन काय असते. मनुष्याणाम्. तेसुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे: मनुष्याणां सहस्रेषु (भ.गी. ७.३.) हजारो मनुष्यांपैकी एखाददुसरी व्यक्तीच या समस्यांचे समाधान करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते. सर्वचजण नाही. सर्वजण, त्यांना हेसुद्धा माहीत नाही की समस्या काय आहे. त्यांना त्याच्याबद्दल काही चिंताही नाही. ते विचार करतात, "ठीक आहे, समस्या असतील तर असोत. आम्हाला हे जीवन मिळाले आहे. आपण आपल्या इंद्रियांचा उपभोग घेऊ या." त्यामुळे ते जवळजवळ पशूच आहेत.
पण या समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल जे जिज्ञासू आहेत, त्यांना खरोखरच मनुष्य म्हणून स्वीकारले जाते. अन्य लोक, ते मनुष्यही नाहीत. ते जवळजवळ पशूच आहेत. तर तुम्हाला ही संधी मिळाली आहे. या शरीराचा योग्य वापर केला गेला पाहिजे. कसे समस्येचे निराकरण करायचे. जर आपण केवळ स्वतःला जन्म मृत्यूच्या लाटांमध्ये वाहवून दिले. वेगवेगळ्या प्रकारचे शरीर, ती फार चांगली हुशारी नाही. बुद्धिमत्ता नाही. त्यामुळे या मनुष्य शरीराचा वापर समस्येचे समाधान कसे केले जाईल यासाठी केला जायला हवा. ती आहे वैदिक संस्कृती. ते खऱ्याखुऱ्या समस्यांच्या समाधानावर जास्त भर देतात. भौतिकवादी जीवन म्हणजे समस्या निर्माण करणे आणि त्या वाढवणे. ती काही परिपूर्ण मानवी संस्कृती नाही. परिपूर्ण मानवी संस्कृती म्हणजे तुम्ही अतिशय शांतपणे, स्थिरपणे बसायला हवे आणि तात्त्विक दृष्टीने विचार करायला हवा, "या समस्यांचे समाधान कसे करावे? मला ज्ञान कुठून प्राप्त होईल?" हे आहे मनुष्य जीवन. संपूर्ण वैदिक शिकवणही तीच आहे. आता तुम्ही या मनुष्य जीवनाचा उपयोग समस्यांचे समाधान करण्यासाठी करून घ्या. मरू नका, मृत्यूपूर्वीच तुम्ही या समस्यांचे समाधान करा. कुत्र्या मांजराप्रमाणे मरू नका. नाही. आणि जो प्रयत्न करतो… वेद म्हणतात, एतद्विदित्वा यः प्रयाति सर्व ब्राह्मणः : "जो जीवनाच्या समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न केल्यावर मरण पावतो, तोच ब्राह्मण आहे." आणि जो कुत्र्या मांजरांप्रमाणे मरण पावतो, त्याला म्हणतात कृपण. कृपण म्हणजे खूपच निम्न बुद्धीचा मनुष्य. त्यामुळे आपण कुत्र्या मांजरांप्रमाणे मरायला नको. आपण ब्राह्मणाप्रमाणे मरण पावले पाहिजे. जरी या जीवनात त्या समस्येचे समाधान झाले नाही, तरी तुम्हाला दुसऱ्या जीवनाची संधी मिळते. जसे की ही सगळी मुले जी आमच्याकडे आली आहेत. हे समजले पाहिजे की त्यानी त्याच्या मागील जीवनात सुद्धा प्रयत्न केला आहे. समस्यांचे समाधान करण्यासाठी, मात्र ते पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे ही दुसरी संधी आहे. या गोष्टी भगवद्गीतेत सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता, या जीवनात, तुम्ही दृढ असायला हवे. ते लोक जे या कृष्णभावनेच्या संपर्कात येत आहेत, व साधनेसाठी दीक्षा घेत आहेत, त्या लोकांनी अतिशय दृढ असायला हवे की "या जन्मातच आपण या समस्यांचे समाधान प्राप्त करून घ्यायला हवे. आता पुन्हा नाही. आता पुन्हा परत येणे नाही." हा आपला दृढ संकल्प असायला हवा. तर हे कृष्णभावनामृत आंदोलन याच हेतूसाठी आहे, जीवनाच्या समस्यांचे समाधान प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या घरी, भगवद्धामात परत जाण्यासाठी, जेथे आपल्याला ज्ञानाचे शाश्वत, आनंदमय जीवन प्राप्त होते. कृष्णभावनामृत आंदोलनाचे हेच सार आहे.